आम्ही गौताळ्याला गेलो, पण बिबट्याच दिसलाच नाही...

        आम्ही गौताळ्याला गेलो, पण बिबट्याच दिसलाच नाही...
गौताळा अभयारण्य मार्ग 
गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगांव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे. औरंगाबाद पासून ६५ कि.मीअंतरावर असलेलं हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्षजाती, प्राणी, पक्ष्यांचा अधिवास असलेले दोन हजार सहाशे दहा चौ.कि.मी. क्षेत्र आहे. महाराष्ट्र शासनाने दि२५ फेब्रु.१९८६ रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले. या अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे एकोणीस हजार सातशे सहा हेक्टर तर जळगांवचे सहा हजार तीनशे पंच्चावन्न हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. अभयारण्यात बिबट्या, लांडगे, कोल्हे, रानडुकरे, नीलगायी, गवे यासह इतर ५४ प्रजातीचे प्राणी तर २३० प्रजातीचे पक्षी असल्याची नोंद आहे.
आमच्या प्रथम वर्षाचे प्रा.दत्ता कानवटे सर यांनी आमच्या वर्गामधी एकच घोषणा केली. ती म्हणजे गौताळा येथे तुमच्या वर्गाची दोन दिवसीय सहल जाणार आहे आणि त्या दिवसापासून आमच्या वर्गात एकच चर्चा जोर धरत होती. ती म्हणजे गौताळ्याची.
सर्वाना एकच उत्सुकता लागली होती, की गौताळ्याला कधी जायचं म्हणून ?
कानवटे सरांनी सर्वाना गौताळ्याविषयी माहिती आणि जाण्याचे नियोजन सांगितले. मुलांनी सरांना एक ना अनेक प्रश्न विचारूनसरांनी त्यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली आणि गौताळ्याला येणार म्हणून सर्वानी होकार दिला
ठरल्याप्रमाणे गौताळ्याला जाण्याचा दिवस उजाडलाआणि तो दिवस म्हणजे २० जाने. वार शनिवार वेळ दुपारी १२ वाजता सर्वजण तयारीत आले होते. जाण्याची तयारी झाली आणि मध्येच अचानकपणे काही तांत्रिक कारण उद्धभल्याने आमच्या वर्गामधील काही मित्र येऊ शकले नाही, त्यामुळे आम्ही  त्यांना मीस करत होतो.
गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आमच्या सर्वांची ओढ लागली होती. आम्ही औरंगाबाद वरून दुपारी :०० वाजता च्या सुमारास गौताळ्याच्या दिशेने आमच्या महाविद्यालयायीन संस्थेच्या बसने निघालो. या सहलीचे सर्व नियोजन दत्ता कानवटे सरांनी केले होते. आम्ही एकूण २० जन होतो. औरंगाबादपासून तर गौताळ्यापर्यंत आम्ही सर्वानी खूप धम्माल, मौज ,मज्जा, गाणी म्हणणे, विनोद सांगणे . करता करता कधी गौताळा आले तर, ६५ कि.मी.अंतर कधी कापले आम्हाला कळलेच नाही.
सरळ गौताळा अभयारण्याच्या पाटणदेवीच्या हिवरखेडा प्रवेशव्दारावर पोहोचलो. तिथे चौकीमध्ये कानवटे सरांनी नोंद केली आणि आम्ही सर्वजण बसच्या खाली उतरलो आणि आम्हाला वनविभागाच्या कार्यालया जवळ घेऊन जाण्यात आलं आणि आम्हाला वनविभागाचे वनरक्षक शेख सर यांनी अभयारण्यविषयी माहिती काही सुचना दिल्या.
सायंकाळच्या  :३० मिनीटांच्या सुमारास आम्ही मुख्य जंगलात दाखल झालो.आम्हाला प्रत्येक वेळी जंगलात दिसणार्या विविध गोष्टी बद्दल माहिती देत होते. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात फिरत असतांना प्रचंड उत्सुकता प्रत्यक्षात समोरासमोर प्राणी, पक्षी पाहण्याची इच्छा निर्माण झाली होती .  
पायांचा आवाज करता हळू हळू चला, शेख सर आम्हाला सांगत होते. चालतांनी आम्हाला अनेक ठिकाणी प्राण्यांच्या विष्ठेचे दर्शन घडत होते. तसेच अनेक प्रकारची औषधी वनस्पतींची झाडे, फुलझाडे दिसत होती. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनांमधून वाहणारा एक नाला दिसतो, त्याला 'चंदन नाला' असे म्हणतात. नाल्याच्या काठावर अनेक रंगेबीरंगी पक्षी दिसत होते.
पुढे एक मंदिर आहे, या मंदिरासमोर गौतळा तलाव आहे. या तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या ठिकाणी पूर्वी गवळी लोक राहायचे .त्यांच्या गायी या परिसरात चारायच्या त्यावरून या तलावाला 'गौताळा' हे नाव पडले. राजस्थानी मिशांना हात फिरवत शेख सर सांगत होते.
जसे पुढे गेल्यावर तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोर्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग न्याहाळता येतो प्राणी पक्षांना पाणी पिण्यासाठी ठिक ठिकाणी पानवठे वनविभागाने तयार केलेले आहेत. पुढे डाव्याबाजूला सातमाळांचा डोंगर दिसतो, या डोंगरातून नागद नदी उगम पावते, ती उजवीच्या भेळदरीत उतरते, त्याच नदीवर नागद तलावाचे पाणी टिकून राहते, या तलावा वर वन्यजीव उन्ह्याळ्यात पाणी प्यायला येतात. शेख सर आम्हाला सांगू लागले.
          थोड पुढं गेल्यावर आम्हाला उंच टेकडी दिसलीआणि टेकडीवर दाटझाडी होती, आम्ही ती उंच टेकडी भराभरा चढून टेकडीवर पोहचलो. अंधार पडण्यास सुरूवात झाली होती. आम्ही तिथे बघितल्यावर तिथ एक गुहा दिसली. गुहेत गौतम ॠषीची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ॠषी तप करत, अस बोलले जाते. आम्ही टेकडीवरून खाली आलो आणि आम्ही बस मध्ये बसून आमच्या निवास स्थानाकडे निघालो आणि काही वेळातच तेथे पोहचलो. चांगलाच अंधार पडला होता. गेस्ट हाऊस मध्ये जाऊन आम्ही सर्व फ्रेश होऊन आरामात एकत्र बसून विविध विषयांवर हसत खेळत मनमोस्त गप्पा मारल्या. त्यानंतर सर्वानी सोबत आणलेले जेवनाचे डब्बे खाल्ले. आणि त्यानंतर सर्वजण आप आपल्या ठिकाणी झोपायला गेले
 ठिक सकाळी वाजता सर्वजण तयार होऊन परत मुख्य जंगलात फिरायला निघालो. पहिल्यांदाच जंगलातले सकाळचे स्वच्छ गारेगार वातावरण आम्ही अनुभवत होतो.अंगाला थंड हवेची झुळूक स्पर्श करून जात होती. जसे आम्ही पुढे जात होतो, तसे सकाळच्या सूर्याचे सुंदर, मनमोहक रूप आणि कोवळी किरणांचे दर्शन घडत होते. जंगलात फिरत असतांना आमच्यातील काहींनी तर फोटोशूट, सेल्फ्या काढल्या. या जंगलात बिबटे, लांडगे, कोल्हेरानडुकरे, नीलगायी असे अनेक प्राणी आहेत. तसेच पशू-पक्षी, वृक्ष वेली आणि वनौषधी यांनी गौताळा अभयारण्य संपन्न आहे.आमच्या सोबत असलेले सर्पमित्र अनिल सर सांगत होते. आमच्या सर्वाची एकच इच्छा होती, फक्त एकदाच बिबट्याने दर्शन द्यावे. पण बिबट्या काय दिसलाच नाही, सर्व जंगल पायी तुडवून, आम्ही सर्वजण ठिक :३० वाजता निवासस्थानाकडे आलोसर्वजण फ्रेश होऊन चहा नास्टा घेतला
 गौताळा अभयारण्याचा परिसर पाहून काही तासांनी म्हणजेच ठिक ११:१५ वाजताच्या सुमारास आम्ही ऐतिहासिक अंतुर किल्ल्याकडे चालते झालो.पाच सात कि.मी.चे अंतर केल्यावर, दोन डोंगराला वळसा घालून डाव्या बाजूला अंतुर किल्ला दिसतो, बलाढ्य भव्य दिसणारा, किल्ला पाहून मन खरंच छक्क झालं. किल्ल्याची बांधणी दूरूनच मोहित करते. एवढ भक्कम बांधकाम किल्ल्यावर केल आहे. किल्ल्याचा इतिहास सांगतोय, की हा किल्ला १५व्या शतकात मराठ्यांनी बांधलाय. पण १७ व्या शतकापासून तो अहमदनगरच्या  निजामाकडे गेला,तो अखेर पर्यंत . पुढे गेल्यावर गोमुखी दरवाज्यावर पोहचलो, दरवाजाची निर्मिती अतिशय उत्कृष्ट होती. या दरवाज्यावर चक्क तोफेचे गोळे लावलेले आहेत. तसेच दरवाज्यावर पारशी भाषेत शिलालेख कोरला आहे, आम्ही वर पुढे पठारावर पोहचलो. उजव्या बाजूने किल्लाचे बुरूज दिसते, तसेच आम्ही तलावाजवळ आलो, तलाव मोठा असून, अजूनही तो पूर्णतः भरलेला दिसला. त्यातील पाणी पिण्या योग्य नव्हते, उजव्या बाजूला मुस्लिम बांधवाची पिराची मज्जिद आहे, तटबंदी पण आहे. दुपारचे :३० वाजले होते. सूर्याने आपली आग चांगलीच पेटवली होती. आम्ही किल्ल्यावरून खाली भराभरा आलो आणि बसमध्ये बसून हिवरखेडच्या दिशेने निघालो, पुढे काही कि.मी. गेल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये ठाकर आदिवासी बांधवाची वस्ती दिसली. आम्ही गाडी थांबवली आणि त्या वस्तीत गेलो, त्यांच जनजीवन पाहून मनाला बैचेन करून टाकते. त्यांच्याशी संवाद साधून आम्ही पुढे गेल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर एक सुमारे ९६ वर्षाचे वयोवृद्ध भाऊराव गांगडे हे अनेक आजारांवर विविध वनौषधी देणारे आजोबा मुळव्याध, पोटदुखी, सर्दी ताप, हात पाय दुखणे, साप चावणे, इत्यादी आजारांवर लोकांचे मोफत उपचार करतात. त्यांच्या विषयी माहिती घेऊन,आम्ही पुन्हा हिवरखेडच्या दिशेने निघालो, आता सर्वाना जाम भुका लागल्या होत्या.
          ठिक दुपारी :४५ मिनिटांनी आम्ही हिवरखेडला पोहचलो. तेथील वनविभागाच्या कार्यालयाच्या समोरील हिरवळीच्या जागेवर गर्द झाडांच्या थंडगार सावलीमध्ये आमच्या सर्वांसाठी दुपारच्या उत्तम जेवनाचे नियोजन आधीच  कानवटे सरांनी करून ठेवले होते. वरण, भात, चपाती, अस्सल गावराण खांदेशी वांग्याची मसालेदार झनझनीत भाजी, सोबत हिरव्या मिरच्यांचा ठेचा, कांदा, लिंबू, गाजर, असा अस्सल खांदेशी जेवनाचा बेत होता.आम्ही सर्वांनी हात धुवून पटापट पंगती करून बसलो. सर्वांना खूप भूक लागल्यामुळे जेवना वर तुटून पडलो होतो. जेवन रूचकर स्वादिष्ट होते.
सर्वांची जेवने आटपून, आम्ही थोडा वेळ झाडांच्या थंडगार सावलीमध्ये आराम केला आणि ठिक :४० मिनिटांनी पितळखोरा लेण्यांच्या दिशेने निघालो. जवळपास सुमारे ३० कि.मी. अंतर पार करून कसे बसे आम्ही ठिक : २० मिनिटात लेण्यांवर पोहचलो.
                     पितळखोरा लेण्यांचा नजारा खूप सुंदर दिसत होता. खूप प्रसन्न वाटत होत. सर्वजण फोटो, सेल्फ्या काढण्यात व्यस्त झाले होते. पितळखोरा लेणी ही कन्नड पासून २८ कि.मी.वर आहे, ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन आहेजगप्रसिद्ध वेरूळ,अजिंठा लेण्यांपेक्षाही प्राचीन आहे. इसवी सन दुसऱ्या शतकातील आहे. आमच्या सोबत असलेले शेख सर माहिती देत होतेया लेण्यातील काही गुफा दुमजली असुन वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेलया आहेत. मुख्य गुफा म्हणजे एक मोठा चैत्य, मध्य भागात ३५ स्तंभ असून तपकिरी पिंगट रंगात भगवान गौतम बुद्धांची चित्रे आहेत. बघता बघता सायंकाळचे :०० वाजले होते. असे वाटत होते की, येथून जाऊच नये, खूप छान वाटत होते. वेळेची मर्यादा असल्याने आम्ही सर्वांनी जगप्रसिद्ध ऐतिहासिक पितळखोरा लेण्यांना आम्ही सर्वांनी टाटा केला आणि भविष्यात पुन्हा भेटू असे बोलूनमुख्य रस्त्यावर आलो आणि आम्ही बसमधी बसून परतीच्या मार्गाने औरंगाबादकडे निघालो आणि कन्नड ला बस थांबवून वनरक्षक शेख सर खाली उतरले, आम्ही गौताळ्याला आल्यापासून त्यांनी आम्हाला मोलाची माहिती दिली. आम्ही सर्वांनी त्यांचे आभार मानले, आणि त्यांना टाटा केले, भविष्यात पुन्हा भेटू असे बोलून... आम्ही औरंगाबादच्या दिशेने निघालो, सर्वजण बसमधी आता शांत पणे बसुन होते आणि औरंगाबाद जवळ आल होत, सर्वांच्या तोंडून एकच वाक्य निघले, आपण गौताळ्याला गेलो, पण बिबट्याच दिसलाच नाही... पण गौताळा फिरायला खूप मजा आली आम्हाला...आमच्यासाठी अविस्मरणीय गौताळा सहल ठरली..कायम राहणार आमच्या सर्वांच्या मनात...
आणि आम्ही साधारण रात्री :४५ पर्यंत औरंगाबादला पोहचलो.
           
- समाधान ( सम्राट ) नाथा मोरे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा